Events

Home / Events

Important Abhishek Tithi’s (Every Month) : Shudha Asthami, Shudha Pournima

दर महिन्यातील महत्त्वाचे अभिषेक तिथी माहिती : शुद्ध अष्टमी, शुद्ध पौर्णिमा

Shravan Month : Second Friday : Varad Mahalaxmivrata

श्रावण महिना : दुसरा शुक्रवार – वरद महालक्ष्मीव्रत

Kartik Mahina : Kartik Festival (from Narak Chaturdashi to Kartik Pournima)

कार्तिक महिना : कार्तिक उत्सव (नरक चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा)


मंदिरातील वार्षिक चैत्र ते फाल्गुन मंदिरातील उत्सव माहिती

चैत्र महिना

गुढीपाडवा(चैत्र शुद्ध प्रतिपदा) : या वेळी देवस्तानतर्फे तुळशी वृन्दावनजवळ गुढी उभारली जाते.ज्या वेळी देवीस महानैवेद्य येतो त्यावेळी गुढीचा पण नैवेद्य असतो तो नैवेद्य गुढिस दाखवून हवालदारास देण्यात येतो.

रामनवमी (चैत्र शुद्ध नवमी): रामनवमीच्या दिवशी साडेअकराची घाट साडेदहा वाजता करुन रामजन्म व्ह्यायच्या आत (दुपारी १२च्या आत ) देवीची आरती व शंखतीर्थ करुन घेणेचे असते व सालंकृत पूजा बांधनेची असते

रथोस्तव (चैत्र कृ.प्रतिपदा): चैत्र शुद्ध पोर्णिमेस देवीचा रथोस्तव साजरा केला जातो.त्यावेळी रात्री ७.३० ते ८.० या वेळेत उस्तवमुर्ती वहिवाटदार पुजाऱ्याने रथावर आणून बसवायची असते रथावरच दागिने हवालदाराकडून घ्यावयाचे असतात. रात्री नगरप्रदक्षिणा सोहळा मोठ्या प्रमाणात होतो. जोतिबा यात्रेसाठी आलेले तीन ते पाच लाख भाविकांपैकी बहुतांश भाविक हा राथोस्तव पाहण्यासाठी येतात. रथचा नगरप्रदक्षिणा सोहळा असतो. महाद्वारातुन नगरप्रदक्षिणेस सुरवात होउन गुजरी ,भाऊसिंगजी रोड ,भवानी मंडप ,गुरुमहाराज वाडा ,बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथोस्तव होतो. देवीचा रथ छत्रपतींच्या पुजेकरता, भवानी मंडपात त्यांच्या देविसमोर थांबवला जातो.रथ महादरवाजात परत आल्यावर राजघराण्यानी देविवरून दृष्ट कढावयाची असते.दृष्ट काढल्यावर त्यांच्या वोटीत पुजाऱ्याणी खण नारळ घालायचा असतो. ज्यावेळी ग्रहण असते ,त्यावेळी ज्यावेळी वेध लागतो तो वेध लागण्याच्या आधी देवीचा महानैवेद्य दाखवावयाचा असतो. वेधात आरत्या केल्यातरी चालतात पण नैवेद्य मात्र दुधसाखरेचा दाखवण्याचा असतो. ग्रहण लागताना सरस्वती ,महाकाली ,गणपती ,मातुलिंग स्नान सुटल्यावर स्नान घालण्यात येतो.

वैशाख महिना

अक्षयतृतीया (वैशाख शु.तृतीया)  : या दिवशी गरुड़ मंडपात उस्तवामुर्तीस झोपाळ्यावर बसवण्यात येते.उस्तवमुर्तींचे अलंकार हवालदाराकडून झोपाळ्यावर घेण्यात येतात. यावेळी दुपारी चारच्या सुमारास गरुड़ मंडपात झोपाळ्यावर चोपदार ,मशाल ,वाजंत्री व नौबत यासह उत्सवमुर्ती आणण्याची असते. अक्षयतृतीया शुक्रवारी व मंगळवारी असेल तर त्यावेळीच बाहेरच्या देवांना आरती नेऊन मग झोपाळ्यावरील देवीस ओवाळवयाची असते. या वेळी देवीस आत नेताना तोफ होत नसते.अक्षयत्रुतियेचे दिवशी देवस्थान हळदी कुंकू (पन्हे व कोशिंबीर ) ज्याचा आठवडा असेल तय पूजाऱ्याच्या स्त्रियांनी देवस्थानचा जो शागिर्द असेल त्याच्या हातात चांदीच्या वाटीतुन भिजाणे व वाटीतुन पन्हे व कोशींबीर घेऊन येणे ,त्याचा नैवेद्य प्रथम दाखवुन अंबाबाईला दाखवून शागीर्दाने आठवडेकरी पूजाऱ्याच्या स्त्रियांना बरोबर घेवून श्री सरस्वती व श्री महाकाली ,श्री गणपती या ठिकाणी भिजाणे, पन्हे ,कोशींबीर ठेवणे यावेळी मशाल सोबत असते. मंडपात पूजाऱ्याच्या स्त्रियांनी अंबाबाईचे म्हणून दर्शनास आलेल्या सवाष्णीना हळदीकुंकू द्यायचे असते.

शुक्रवारी अक्षयतृतीया आल्यास आरती सर्व देवांना फिरून गरुड़ मंडपात येते. त्यानंतर मोकळी पालखी गरुड़ मंडपात आणणेची असते. नंतर झोपाळ्यावरील उत्सवमूर्ती सोडवून पालखीत बसल्यावर पालखी निघते. पालखी फिरून परत गरुड़ मंडपात आल्यावर उत्सवमूर्ती पुन्हा झोपाळ्यावर बसते. मग तोफ झाल्यावर आरती ओवाळुन आरती आत गेल्यावर मुर्ती पुन्हा पालखीतून आत जाते व पुढील कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतो.राष्ट्रीय दिनाच्या वेळी : २६ जानेवारी , १ मे , १५ ऑगस्ट या दिवशी खडी पूजा बांधून देवीस जडजवाहीरांचे दागिने घालावयाचे असतात

आषाढ महिना

आषाढी एकादशी : या एकादशीदिवशी देवीस साडेनऊच्या आरतीस, शाबुदाण्याची खीर असते व महानैवेद्यास उपवासाचे (फ़राळाचे ) जिन्नस असतात रात्रीच्या साडेआठच्या आरतीस नैवेद्य म्हणून बर्फी असते. या दिवशी शेजारतीला विडा नसतो. द्वादशी दिवशी देवीस नऊच्या आरतीस महानैवेद्य असतो. बाराच्या आरतीस पेढ्याचा नैवेद्य असतो. ज्यावेळी दोन एकादशी असतात त्यावेळी पहिली स्मार्त एकादशी देवीची असते. त्या दिवशी शेजारातीला देवीचा निद्रा विडा म्हटला जात नाही

श्रावण

नागपंचमी (श्रावण शु.पंचमी) : नागचतुर्थी दिवशी संध्याकाळी सरस्वतीजवळ नाग बसवायचा असतो. या नागपंचमीच्या दिवशी आठवडेकरी पुजाऱ्याने श्री सरस्वतीजवळ नागाजवळ बसावयाचे असते. त्यामुळे येणारी मिळकत त्यानेच घ्यायची असते. षष्टी दिवशी त्या नागास दहीभाताचा नैवेद्य दाखवून मातीचा नाग (प्रतीक म्हणून ठेवलेला नाग ) पाण्यात विसर्जन करावयाचा असतो.

वरद महालक्ष्मी व्रत  : या व्रताची / उत्सवाची तीथी निश्चित नसते. श्रावण पोर्णिमेच्या जवळच्या शुक्रवारी या व्रताची पूजा असते. श्रावण महिन्यात चार शुक्रवार आले असता तिसऱ्या शुक्रवारी किंवा ४ शुक्रवार आले असता दुसऱ्या शुक्रवारी या व्रताची पूजा असते. फ़क्त याच दिवशी देवीची सालंकृत दागिन्यानी पूजा नसते.या दिवशी देवीचे दागिने घेतले जात नाहीत तरी उत्सवमूर्तीचे दागिने घ्यावयाचे असतात या व्रताची पूजा संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी तास दिड्तास सुरू होते.पूजेचा कालावधी साधारणत: साडेतीन ते चार तास असतो. साडेचारच्या दरम्यान पूजेस सुरवात करुन पूजा आठ वाजेपर्यंत संपवायची असते. या व्रताची पूजा पाच पुजारी घराण्याकडेच आहे.आठवडेकरी पुजारी कोणीही असला तरी या पाच जणांनीच करायची असते. ते पुजारी पुढीलप्रमाणे १) शेखर मुनीश्वर २) रामभाऊ मुनीश्वर ३) सुरेश मुनीश्वर ४) प्रकाश मुनीश्वर ५) रमाकांत ठाणेकर.
या दिवशी सकाळचे स्नान ,आरती व संध्याकाळची आरती नेहमीच्या वेळेत होत असते.रात्री ९.३० वा. पालखी असते.या पूजेच्या वेळी वरील पूजाऱ्यानी देवीस अर्पण केलेली दक्षिणा , फ़ळे ,साडया , नारळ इ. आठवडेकरी पुजाऱ्याने घ्यायचे नसून कुलोपाध्याय श्री लाटकर गुरुजी यांचेकडे देणेचे असते.

गोकुळाष्टमी (श्रावण कृ. अष्टमी ) : या दिवशी देवीच्या देवळात धनवंतरी जो गोपाळ कृष्ण आहे ,त्याचा जन्मोस्तव पूजाऱ्यानी करावयाचा असतो. त्या करीता जन्मोस्तवाच्या आधी एक किर्तनकार पुजाऱ्यानी सांगावयाचा असतो. त्याची सर्व व्यवस्था (पेटी व तबला ) पुजाऱ्यानी द्यावयाचा असतो. जन्मोस्तवाला लागणारा चांदीचा चढावा/ पाळणा समितीने देण्याचा आहे.तो फुलांनी पुजाऱ्याने सजवण्याचा आहे.पाळण्यामध्ये लागणारे कुंची , नारळ पाने ,सुपारी पूजाऱ्यानी आणण्याचे असते. या दिवशी देवीसा भाजका उपासाचा नैवेद्य असतो. तो नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा असतो. सकाळी खिरीचा व दुपारी पेढ्याचा नैवेद्य असतो. बाळकृष्णाचा असणारा नैवेद्य हवालदारास देण्याचा असतो.या दिवशी रात्री ८. १५ ची आरती, शंखतीर्थ नेहमीप्रमाणे होते. परंतू शंखतीर्थ झाल्यावर देवीचे दागिने / पूजा उतरवायची नसते. पूजा रात्री १२ वाजल्यानंतर कृष्णजन्म झाल्यावर कीर्तन संपल्यावर उतरवायची असते. दागिने सील झाल्यावर शेजारती घाट होते. कीर्तनकार व त्यांच्या सहकाऱ्याना पूजाऱ्यानी मानधन व नारळ प्रसाद देणेचा असतो.

भाद्रपद

गणेश चतुर्थी (भाद्रपद शु.चतुर्थी ): या दिवशी देवीच्या समोरील गणपतीस देवीच्या अलंकार पुजेनंतर अलंकार घालण्याचे असतात व रात्री साडेआठ्च्या आरतीच्यावेळी गणपतीची आरती होताच १ शेर चिरमुरे व नारळ फोडुन तय खोबऱ्याचे तुकडे करुन त्याचा नैवेद्य दाखवून भक्तांना वाटण्याचा असतो. चिरमुरे व नारळ समिती आणत असते.पण कमी पडू नए म्हणुन पूजाऱ्यानी पण आणावे.

भाद्रपद महिन्यात भाद्रपद कृष्ण एकादशीला शारदीय नवरात्रोस्तवच्या तयारीसाठी देऊळ धुण्याचे असते. भाद्रपद कृष्ण एकादशीला शुक्रवार / मंगळवार आल्यास एक दिवस मागे अथवा पुढे देऊळ धुतले तरी चालते. त्यावेळी सकाळी सात वाजता घाट होऊन सकाळी ९ वाजेपर्यंत आरती व शंखतीर्थ पूर्ण करणेचे असते. त्यावेळी सकाळी नैवेद्य असतो. देऊळ पुर्ण धूवून झाल्यावर घाट वाजते. मगच सरस्वतीजवळ असलेली उत्सवमूर्ती तांब्यातून पाणी शिंपडत आत आणतात. यावेळी साधारणत: सांय. ६ वाजलेले असतात मगच बाराचे स्नाने , आरती , ८.३० ची आरती व शेजारती करायची असते. यादिवशी देखील देवीचे दागिने घेतले जात नाहीत.

आश्विन

नवरात्र – घटस्थापना (आश्विन शुं.प्रतिपदा ) : या दिवशी घट स्थापन करण्याचे काम खातेदार जेष्ठ घराणे मुनीश्वर यांनी करावयाचे असते. घटस्थापनेपासून नवमीपर्यंत देवीच्या सकाळच्या स्नानाचे सर्व विधी त्यांनीच करावयाचे असतात. सकाळच्या आरतीची घंटा त्यांची पूजा पूर्ण झाल्यावर करावयाची असते. ही घाट त्यांनी नवमीपर्यंत करावयाची असते.

टेंबलाई / ललिता पंचमी (आश्विन शु.पंचमी ) : या दिवशी सकाळची पुजा साडेसात वाजता चालु करून आरती व शंखतिर्थ झाल्यावर ९.३० पर्यंत पूर्ण करण्याचे असते. शंखतिर्थ झाल्यावर ९ .३० ते ९ .४५ च्या दरम्यान उत्सवमुर्ती त्र्यंबुलीला भेटण्यासाठी गरुड मंडपात आणलेल्या पालखीत बसवण्याची बांधायची असते. दहा वाजता तोफ झाल्यावर देवी त्र्यंबुलीला भेटण्यासाठी निघते. प्रथम शाहू मिलमध्ये जाऊन तेथे मिलतर्फे देवीस साडी अर्पण होते. ते पूजाऱ्यानी घेण्याचे असते. नंतर देवस्थानतर्फे देवीची पूजा होते. यावेळी पूजा झाल्यावर देवस्थान कामगार व हवालदार यांनी पालखीच्या दांडयावर भुमिदक्षिणा ठेवायची असते. ती दक्षिणा पूजाऱ्यानी घ्यायची असते. त्यानंतर देवी टाकाळ्य़ावर जाते. तेथे संस्थानतर्फे पूजा होते. त्यानंतर देवी त्र्यंबुलीच्या देवळात जाते. देवीची पालखी दुपारी बारा पर्यंत टेंबलाई देवळात न्यायची असते.त्र्यंबुलीच्या येथे पालखी गेल्यावर हक्कदार पूजाऱ्याने ती त्र्यंबुलीच्या भेटीकरता , त्र्यंबुलीजवळ नेण्याची असते. त्यावेळी पुजाऱ्यापैकी एकाने त्र्यंबुलीसमोर बसून ज्याने मूर्ती आणली असेल त्याचेकड़ून स्वत:च्या मांडीवर बसवण्याची असते. नंतर हक्कदार पुजाऱ्याने त्र्यंबुलीची व देवीचा भेट घडवून पूजा व आरती करावयाची असते.नंतर त्र्यंबुलीच्या पुजाऱ्याकडून भेटीचे आठ नारळ घेऊन मगच मूर्ती बाहेर आणावयाची असते. त्र्यंबुलीपासून बाहेर मूर्ती आणताना त्र्यंबुलीच्या समोर कुमारिका असते तिला अंबाबाई भेटावयाची असते. कुमारीकेने देवीच्या दर्शनानंतर कोहोळ्याचा बळी देणेचा असतो. त्यानंतर देवीची मूर्ती पालखीत बसवून बांधन्यात येते. त्र्यंबुलीच्या प्रसादाचा कोहाळा पालखीत आल्यावर मग पालखी उचलावयाची असते. देवी एकवीरा देवीजवळ बिंदू चॊकात आल्यावर देवीची घाट होते. पालखी मंदिराच्या आवारात प्रवेश करेपर्यंत घाट चालुच असते.उत्सवमूर्ती पालखीतून मंदीरात प्रवेश करताना बालदत्ताजवळ देवीवरून नैवेद्य उतरवून टाकला जातो. मगच पालखी मंदिरात प्रवेशते. पालखीत बांधलेली उत्सवमूर्ती सोडवून आता गाभाऱ्यात गेल्यावर एकारती , पंचारती होते व नंतर इतर देवाना आरती ओवाळल्यावर कापूर आरती , शंखतीर्थ होते व ललीता पंचमी सोहळ्याची सांगता होते.रात्रीच्या पालखीनंतर आठवडेकरी पुजाऱ्याने कोहळ्य़ाचा प्रसाद पालखी वाहून नेणाऱ्या लोकांना वाटायचा असतो.

अष्टमी (महालक्ष्मीचा जागर) : या दिवशी रात्री ७.३० ते ८ .०० च्या दरम्यान वाहनावर बसवण्य़ासाठी मूर्ती बाहेर आणावयाची असते व मूर्तीचे दागिने हवालदाराकडून वाहनावर (मंडपात ) घेण्याचे असतात. अष्टमीदिवशी देवीसा भाजका नैवेद्य असतो. तो नैवेद्य संध्याकाळीच दाखवायचा असतो. वाहन नगरप्रदक्षणेला जाताना भवानी मंडपातील जुन्या राजवाड्यात फ़क्त थांबते व तेथे छत्रपतींच्यातर्फे देवीची ओटी भरली जाते व पूजा होते.नंतर वाहन ठरलेल्या मार्गावरून गरुड मंडपात येते. मंडपातील नाचाचा कार्यक्रम झाल्यावर मूर्ती आत जाते.मग कार्यक्रम झाल्यावर देवीची आरती व शंखतीर्थ होते.आरती व शंखतीर्थ झाल्यावर शेजारतीनंतर हक्कदार पूजाऱ्याने जाप्त्याच्या किल्ल्या शेखर मुनीश्वर यांना देण्याच्या असतात. त्या दिवशी रात्री शेखर मुनीश्वर यांची हक्काची देवीची जागराची पूजा असते.

नवमी : अष्टमीच्या रात्री नवमीच्या पहाटे महाकालीजवळ होमहवन होते. होमाचे विधी व आतील पूजा झाल्यावर तोफ होते. तोफ झाल्यावर होमात आहुती दिली जाते. या दिवशी देवीचे द्वार, होमात आहुती पडल्यावर अर्ध्या तासाने साधारणत: सकाळी ८ वा. उघडते. नवमीच्या दिवशी रात्री शेजारतीला निद्रा विडा म्हणणेचा असतो. नवमीचे सकाळी उपचार कसे असतात ? नवमीच्या दिवशी सकाळी ११.३० च्या आरतीला शेखर मुनीश्वर यांची पूजा संपल्यावर आरती, शंखतीर्थ झाल्यावर तोफ होते मगच घटाजवळ बसवलेली उत्सवमूर्ती नित्याच्या जागेला आणली जाते. घटस्थापना ते नवमी या काळामध्ये देवीच्या उस्तवमुर्तीवर कुठलेही अभिषेकाचे उपचार करावयाचे नसतात.

आश्विन शुद्ध पॊर्णिमा (महाप्रसाद ) : आश्विन शुद्ध पॊर्णिमाला महाप्रसाद असतो.तो भक्त मंडळातर्फ़े देवळाच्या आवारात केला जातो. या दिवशी देवीचे जडावरचे दागिने घ्यायचे असतात. या दिवशी देवस्थानतर्फे १५१ लाडू देवीला अर्पण करतात. आश्विन पॊर्णिमेपासून पाच पॊर्णिमा म्हणजे आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पॊष,माघ महिन्यातील पॊर्णिमेला देवीची पालखी रात्री ९ .३० ला निघते.

विजयादशमी (दसरा) : या दिवशी संध्याकाळी ५ वा. च्या सुमारास (सुर्यास्तापुर्वी एक तास ) देवी सोने लुटण्यासाठी दसरा चॊकात जात असल्याने अलंकारासहीत पालखीत बसवण्याची असते. ५ वाजता सिमोलंघनासाठी देवी बाहेर पडते. त्यानंतर दसरा चॊकात जाऊन ती ठराविक जागेला बसते. सुर्यास्ताच्यावेळी छ्त्रपतींच्याहस्ते आपट्य़ाच्या पानाचे पूजन होऊन बंदुकीची सलामी होते. हरीजन वाड्यापासून पंचगंगा नदीवर सिद्धेश्वर महाराजांच्या समाधीपाशी थांबून त्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वीच्या छत्रपतींच्या समाध्या आहते त्या ठिकाणी स्थिरावते नंतर तेथून ती देवालयाकडे यावयास निघते. वाटेत महाराजांच्या स्वाऱ्या दर्शनासाठी येतात.
पालखी खर्डेकर बोळात आल्यावर घाट होते. नंतर एक प्रदक्षिणा पुर्ण करून मंडपात दर्शनाकरीता विराजमान होते. ज्यावेळी पालखीची पहिली प्रदक्षिणा चालू असते त्यावेळी पुजाऱ्याने देवीच्या आरतीस सुरवात करावी. नित्याप्रमाणे आवारातील देवांना आरती ओवाळून मंडपात आरती आणावी मात्र तोफ झाल्यावर पालखी बालदत्ताकडून, दहीभात उतरवून घात घ्यावी. दसऱ्याहून सिमोलंघनासाठी पालखी आल्यावर रात्रीचे शंखतीर्थ झाल्यावर देवीजवळ बसवलेला घट काढावयाचा असतो.
घटस्थापना ते सप्तमी या काळात रात्री पालखी मंडपात बसल्यावर देवीचे म्हणणे करावयाचे असते. ते १० गुरूजी पूजाऱ्यांनी सांगावयाचे असतात.नवमीदिवशी / दसऱ्यादिवशी घराजवळील शेतात उगवलेले ध्यान्याचे तृणांकूर देवीच्या पायावर अर्पण करण्यात येतात.

आश्विन / कार्तिक

नोव्हेंबर ९, १०, ११ देवीचा किरणोस्तव तसेच जानेवारी ३०, ३१ व फेब्रुवारी १ ,२ देवीचा किरणोस्तव यावेळी देवीच्या पायावर, छातीवर व मुखावर किरण पडल्यास, चोपदारास घाट द्यावयास सांगणे व देवीची कापूर आरती करणे.

कार्तिक दिपोस्तव / कार्तिक स्नान

धनत्रोयदशी (आश्विन कृ. त्रयोदशी ) : या दिवशी सरस्वतीसमोर धनवंतरीजवळ पडदा , लाईट वगॆरेची सोय करून आठवडेकरी पूजाऱ्याने धनवंतरीजवळ बसायचे असते. त्यापुढे जमणारे आमीष त्यानेच घ्यायचे असते. या दिवशी धनवंतरीला भक्तांचे अभिषेक असतात.या दिवशी संध्याकाळी घाट ८ ऐवजी संध्याकाळी ७.३० ला होते. त्यानंतर रोजच रथसप्तमीपर्यंत (माघ शु. सप्तमी ) संध्याकाळी ७.३० ला घाट होते. रथसप्तमी दिवशी रात्री ८ वा घाट होते.

दीपावली (नरक चतुर्दशी ) (आश्विन कृ. चतुर्दशी ) : दीपावली व कार्तिक पॊर्णिमा या दिवशी देवीची काकडआरतीची घाट दोन वाजता होत असते. बाहेरच्या देवांना कापूर लावून झाल्यावर पितळी उंबऱ्याजवळ कापूर आल्यावर देवीचा दरवाजा उघडावयाचा असतो नंतर या दोन दोन दिवशी काकडआरती झाल्यावर पहिला पडदा (स्नानाचा ) ५ वाजता टाकावयाचा असतो. इतर पंधरा दिवशी पहिली घाट ३ वाजता होऊन कापूर पितळी उंबऱ्याजवळ आल्यावर दरवाजा उघडावयाचा असतो. या पंधरा दिवशी पहिला स्नानाचा पडदा ५.३० वाजता टाकायचा असतो. यावेळी सकाळी (स्नान झाल्यावर वस्त्र नेसवाल्यावर घाट द्यावयास सांगणे मगच आरती करणे ) ११.३० ची घाट मात्र ११.३० लाच करावयास लावणे. कार्तिक शुद्ध द्वादशीला सकाळच्या (६.०० वाजता ) आरतीला महानैवेद्य असतो.

कार्तिकी एकादशी

कार्तिकी एकादशी – तुळशी विवाह  : कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलशीविवाह असतो. या दिवशी रात्री पंचारती झाल्यावर सरस्वतीजवळ आरती आल्यावर वाजंत्री , लवाजमा ,चोपदार, मशाल , हवालदार इ. नी बाळकृष्ण आणणेसाठी आठवडेकरी पूजाऱ्याच्या घरी जायचे असते व वाजतगाजत बाळकृष्ण पूजाऱ्यांनी आणणेचा असतो. तुलसी विवाहकरीता लागणारे गुरुजी , अक्षता व तुलसी विवाहाकरीता लागणारे साहित्य पूजाऱ्यांनी आणावयाचे असते. देवस्थानतर्फे तुलसीवृंदावन रंगवले जाते.लाईट व ऊस , लागणारे पंचामृताचे ताम्हण व फ़राळाचे जिन्नस देवास्थानतर्फे पुरवले जाते. तुलसी विवाह पुर्ण झाल्यावर चोपदार , मशाल व वाजंत्री यांच्यासह नवरामुलगा (बाळकृष्ण ) पूजाऱ्यांच्या घरात मानाने पोचवायचा असतो. बाळकृष्ण पोचवून आल्यावरच कापूरआरती करावयाची असते. तुलसीविवाह शुक्रवारी किंवा मंगळवारी असल्यास तुलसीविवाह पुर्ण झाल्यावर बाळकृष्ण पोचवून आल्यावरच मगच बाहेरच्या देवांना आरती व्हावयाची असते. शुक्रवारी तुलसी विवाह आल्यास बाळकृष्ण पूजाऱ्याच्या घरी पोचवून आल्यावर बाहेरच्या देवाना आरती फ़िरते व मंडपात थांबते त्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी निघते. पालखी फ़िरून मंडपात आल्यावर तोफ झाल्यावर आरती आत जाते व पुढील कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतात. यादिवशी पालखी ९.३० ला न निघता उशिरा निघते.

धनुर्मास

धनुर्मास (धुंधूर मास ) : सुर्याचा धनु राशीत प्रवेश झाल्यापासून मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला धनुर्मास किंवा धुंधूर मास म्हणतात. हा मास साधारणत: १४ किंवा १५ डिसेंबरच्या मागे किंवा पुढे एक दिवस सुरू होतो. या महिन्यात देवीच्या नैवेद्यात मूगाची खिचडी व बाजरीची भाकरी हे पदार्थ असतात

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी दिवशी सरस्वतीसमोर जी धनवंतरीची मूर्ती आहे , त्याच्यापुढे येणारी सर्व मिळकत वहीवाटदार पूजाऱ्याने घेण्याची आहे. दिवाळीच्या आदले दिवशी रात्रीची ८ ची घाट ७.३० वाजता करण्याची असते.अशी घाट रथसप्तमीच्या आदले दिवशीपर्यंत करण्याची असते. दिवाळी ते कार्तिक पॊर्णिमा या काळात जे शुक्रवार येतील त्या शुक्रवारी देवीची पालखी रात्री ८ .४५ ला काढण्याची असते. दिवाळी ते रथसप्तमीच्या आदले दिवशी पर्यंत शेजारतीची घाट ९ .३० पर्यंत करण्याची असते. कार्तिक पॊर्णिमा ते रथसप्तमी या काळात येणारे शुक्रवार सोडून इतर वेळी जे शुक्रवार येतील त्यावेळी देवीची पालखी ९.१५ ला काढण्याची असते. रथसप्तमीपासून दिवाळीच्या आदलेदिवशीपर्यंत देवीची घाट ८ वाजता होते. व पालखी ९.३० ला निघते. शेजारतीची घाट १० वाजता होते. दिवाळी ते कार्तिक पॊर्णिमा या काळात देवीजवळ अलंकार पूजा बांधल्यावर चांदीच्या दोन समया लावून ठेवण्याच्या असतात दिवाळी ते पांडव पंचमी या काळात देवीच्या अंगावर पुजेच्यावेळी जडावाचे दागिने घालण्याचे असतात.दिवाळी , पाडवा , भाऊबीज व पांडवपंचमी या चार सणांच्या वेळी कुठल्याही दोन सणांना देवीच्या महानैवेदयात पक्वान्न घालण्याचे असते. त्रिपुरी पॊर्णिमेदिवशी पालखी ९.३० वाजता असतो.

मार्गशीर्ष – पौष

पौष पॊर्णिमा ही शंकराचार्याँची पॊर्णिमा म्हणून साजरी केली जाते.या दिवशी संध्याकाळी शंकराचार्य (करवीरपिठाचे ) किंवा त्यांच्या पादुका देवीस भेटीकरता आणतात.त्यावेळी वहीवाटदार पूजाऱ्यांने देवीची कापूरआरती करण्याची असते.
तसेच कोल्हापूरचे छत्रपती व त्यांच्या मंडळी ज्यावेळी अंबाबाईच्या दर्शनास येतात , त्यावेळी त्यांना देवीस स्पर्श करण्याचा अधिकार आहे. व त्यावेळी वहिवाटदार पूजाऱ्यांनी देवीची कापूरआरती करण्याची आहे. त्यांना प्रसाद (नारळ ) देताना ते प्रदक्षिणा घालून आल्यावर तो चांदीच्या ताटातून देणेचा असतो.तशी वर्दी देवस्थानने अगोदर पूजाऱ्यांना द्यावी लागते.

पौष – माघ

माघ पॊर्णिमा ही वैद्य यांची असते. त्यावेळी पालखी ९.३० वाजटा निघते. या महिन्यात शिवाजी महाराजांची जयंती असल्याने त्यादिवशी देवीस जडावाचे दागिने घालण्याचे असतात.याच महिन्यात महाशिवरात्री असते. त्यावेळी देवीस महानैवेद्याच्यावेळी उपवासाचे पदार्थ असतात. व त्या आरतीवेळी (सकाळी ) उपासाची खीर असते.

फाल्गुन

रंगपंचमी (फाल्गुन कृ पंचमी ) : काकड आरतीला आठवडेकरी पूजाऱ्याने केशर मिश्रित पाणी आणून देवीस पांढरे वस्त्र नेसवून त्या वस्त्रावर केशराचे पाणी शिंपडावे व बाहेरच्या असलेल्या भक्तांच्या अंगावर शिंपडावे .
साडेआठच्या स्नानाच्यावेळी देवस्थान समितीकडून केशर मिश्रित पाणी येते.त्या पाण्याने देवीस स्पंजिंग करावे व उरलेले पाणी शंखतिर्थाच्या वेळी पाण्यात मिसळून हे शंखतिर्थ म्हणून मारावे. चैत्र महिना

Bank Details

Bank : State Bank Of India, Branch Dasara Chowk, Kolhapur

A/C No. 32041099786

IFSC. 0000413

Bank : I.D.B.I. Bank, Branch Shahupuri, Kolhapur

A/C No. 464104000021687

IFSC. IBKL0000464

For Mahalaxami Abhishekam

Booking
Click Here
Back To Top